मुखपृष्ट
नोंदणीबाबत
शुक्रवार 03-09-2010, 4:22 am खाली
मला कॉल का मिळत नाही?
       भरती चालु आहे पण मला सेवायोजन कार्यालयातून कॉल नाही, माझ्या मित्राला कॉल मिळाला पण मला नाही. कॉल हवाय, पण त्यापुर्वी तुम्हाला कॉल का मिळत नाही हे जाणुन घेणे आवश्यक आहे. तर मग चला जाणुन घेऊ मला कॉल का मिळत नाही?
       सेवायोजन कार्यालयात नांव नोंदणी करुन देखील तुम्हाला कॉल का मिळत नाही याबाबत तुमच्या मनात खालील प्रश्न उपस्थित होत असतील.
तुम्ही मागासवर्गीय आहात तरी तुम्हाला कॉल मिळाला नाही.
तुमची नोंदणी जुन्यात जुनी म्हणजे उदा. १० ते १५ वर्षे होऊनही कॉल मिळाला नाही.
तुमची शैक्षणिक पात्रता उदा. १०वी/१२वी/पदवी/इत्यादी असूनही तुम्हाला लिपिकाचा कॉल मिळाला नाही.
तुमची शैक्षणिक पात्रता उदा. १०वी/१२वी/पदवी/इत्यादी असूनही तुम्हाला वर्ग-४ उदा. शिपाई पदाचा कॉल मिळाला नाही.
तुमची शैक्षणिक पात्रता उदा. १०वी आणि इंग्रजी टंकलेखन ४० व मराठी टंकलेखन ३० असूनही “लिपिक” लिपिक-टंकलेखक या पदासाठी तुम्हाला कॉल मिळाला नाही.
तुम्ही व तुमच्या मित्राने एकाच दिवशी नोंदणी केलेली आहे तुमच्या मित्राला कॉल आलेला आहे परंतु तुम्हाला कॉल मिळाला नाही.
तुमची नोंदणी जुनी उदा. १० वर्षे होऊनही तुम्हाला कॉल नाही तथापि दुस-या उमेदवारास काल परवा नोंदणी करून देखील त्यास कॉल मिळाला आहे.
अपंग असूनही कॉल मिळाला नाही.
      वरील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण खालील विवेचनावरुन तुमच्या लक्षात येईल.
कॉलकरिता शैक्षणिक तसेच इतर अर्हता असणे आवश्यक आहे.
कॉलकरिता नियोक्त्याने मागणी प्रमाणे अटी उमेदवाराने पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रथम नोंदणी करणा-यास प्रथम संधी
मागासवर्गीयांकरिता पदे आरक्षित असल्या (शासकीय/निमशासकीय आस्थापनांमधील रिक्त पदांकरिता)
उद्योजकाने विशिष्ठ विषयांमध्ये शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची केलेली मागणी.
नोंदणी चालू ठेवणे आवश्यक
आपणापैकी बहुतांश उमेदवारांना शासकीय नोकरी हवी असते.
दिवसेंदिवस वाढणारी नोंदणीची संख्या.
सर्व शैक्षणिक अर्हता, अनुभव, व्यावसायिक पात्रता इ. नोंदी वेळीच सेवायोजन कार्यालयात करणे आवश्यक.
वयोमर्यादेची अट
अनुभवाची नोंद सेवायोजन कार्यालयात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
गुणांची टक्केवारी
तुमचा वास्तव्याचा पत्ता
स्त्री / पुरूषांकरिता राखीव जागा
उमेदवारांच्या पत्त्यामध्ये झालेला बदल
सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पध्दत
पद भरती रद्द झाल्याने
पद भरतीची कार्यवाही प्रलंबित असल्याने किंवा पद भरती रद्द झाल्याने
अपंग असल्यास नोंद करणे आवश्यक
वर्ग-४ च्या पदाकरिता
तुमची व मित्राची शैक्षणिक पात्रता सारखीच आहे
कॉलकरिता शैक्षणिक तसेच इतर अर्हता असणे आवश्यक आहे.
      आपल्याप्रमाणे नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे १० वी खालील, १० वी नापास, दहावी/बारावी उतीर्ण अथवा पदवीधर अशी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता धारण केलेले असतात. मात्र त्यांचेकडे इतर व्यावसायिक / तांत्रिक पात्रता उदा. संगणक / टंकलेखन / मोटार मेकॅनिक / इलेक्ट्रीशियन / प्लंबर वगैरे नसते. सबब अशा उमेदवारांना कॉल येणे कठीण असते.
कॉलकरिता नियोक्त्याने मागणी प्रमाणे अटी उमेदवाराने पूर्ण करणे आवश्यक आहे.
      रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडून उद्योजकाने / नियोक्त्याने मागणी केलेल्या अटीनुसार उमेदवारांच्या नोंदणी जेष्ठतेनुसार शिफारस केली जाते. उदाहरणार्थ नियोक्त्याची मागणी लिपिक पदाकरिता १०वी उतीर्ण, मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आहे व त्याकरिता मे, २००० पर्यंतच्या जेष्ठतेची यादी पाठविण्यात आली आहे. आपण वरील प्रमाणे अर्हता धारण करीत असल्याने आपली शिफारस झाली पाहिजे अशी आपली धारणा आहे. परंतू प्रथम खालील बाबी तपासाव्यात.
प्रथम नोंदणी करणा-यास प्रथम संधी
      आपण १० वी व मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.टंकलेखन प्रमाणपत्राची नोंद केंव्हा केली आहे हे महत्त्वाचे आहे. समजा १० वी प्रमाणपत्र १९९५ मध्ये नोंदविलेले आहे परंतू टायपिंगची नोंद २००२ मध्ये केली आहे, त्यामुळे आपली टंकलेखनाची जेष्ठता २००२ पासून सुरू होते व टंकलेखनाच्या नोंदणी जेष्ठतेनुसार यादी तयार केली असल्याने तुमची यादीमध्ये शिफारस होत नाही. या करिता वेळोवेळी शैक्षणिक पात्रतेत झालेली वाढ सेवायोजन कार्यालयांत नोंदविणे आवश्यक आहे.
मागासवर्गीयांकरिता पदे आरक्षित असल्या (शासकीय/निमशासकीय आस्थापनांमधील रिक्त पदांकरिता)
      याबाबत नियोक्त्याने कदाचित विशिष्ठ प्रवर्गातील (जातीतील) उदा. अनुसूचित जातीचे उमेदवार मागितले असल्यास व आपण त्या प्रवर्गाचे नसल्यास किंवा तुम्ही मागासवर्गीय आहात तथापि तुम्ही त्याबाबत नोंद सेवायोजन कार्यालयांत केली नसल्यास, इतर अटीत बसत असूनही आपली शिफारस होऊ शकत नाही.
उद्योजकाने विशिष्ठ विषयांमध्ये शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची केलेली मागणी.
      अनेकदा नियोक्ते हे विशिष्ठ विषयाची मागणी करतात. उदा. बी.एस्सी. (केमिस्ट्री) अथवा बी.कॉम. (अर्थशास्त्र) अशावेळी आपण त्याप्रमाणे विशिष्ठ विषयातील पदवी धारण न केल्यामुळे आपली पाठवणी होत नाही.
नोंदणी चालू ठेवणे आवश्यक
      आपल्याप्रमाणे नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे १० वी खालील, १० वी नापास, दहावी/बारावी उतीर्ण अथवा पदवीधर अशी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता धारण केलेले असतात. मात्र त्यांचेकडे इतर व्यावसायिक / तांत्रिक पात्रता उदा. संगणक / टंकलेखन / मोटार मेकॅनिक / इलेक्ट्रीशियन / प्लंबर वगैरे नसते. सबब अशा उमेदवारांना कॉल येणे कठीण असते.
आपणापैकी बहुतांश उमेदवारांना शासकीय नोकरी हवी असते.
      आपणापैकी बहुतांश उमेदवारांना शासकीय नोकरी हवी असते. एकंदरच सध्या शासकीय तथा सार्वजनिक क्षेत्रातील नोक-यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे साहजिकच रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेकडे जागा कमी अधिसूचित होतात. मात्र उमेदवारांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. साहजिकच त्यामुळे कॉल प्राप्त होण्याचा कालावधी वाढत जातो.
दिवसेंदिवस वाढणारी नोंदणीची संख्या.
      लक्षात घ्या की, रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेकडून आपल्या नांवाची फक्त शिफारस उद्योजकाकडे / नियोक्त्याकडे करण्यात येते. त्यामुळे शिफारस केलेल्या यादीतील काही अथवा सर्व उमेदवार हे प्रत्यक्ष नोकरीकरिता नियोक्त्याने न निवडल्याने असे उमेदवार नोंदणीपटावर कायम राहतात व अशा त-हेने उमेदवारांची संख्येत दिवसेंदिवस भरच पडत राहिल्याने पात्र असूनही आपली प्रत्यक्ष शिफारस होण्यास बराच कालावधी लोटतो.
सर्व शैक्षणिक अर्हता, अनुभव, व्यावसायिक पात्रता इ. नोंदी वेळीच सेवायोजन कार्यालयात करणे आवश्यक.
      मागणी केलेल्या पदाकरिता आवश्यक असलेली पात्रता आपल्याकडे आहे तथापि त्याची नोंद सेवायोजन कार्यालयात केलेली नसल्याने आपणास कॉल मिळत नाही.
वयोमर्यादेची अट
      राज्य शासकीय सेवेकरिता सध्या सर्वसाधारण उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांस ३८ वर्षे आहे. तसेच केंद्र शासनाच्या सेवेकरिता सर्वसाधारण उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा २८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांस ३३ वर्षे आहे. या वयोमर्यादेत नसल्याने तुम्हाला कॉल मिळत नाही.
       वरील विवेचनावरून तुम्हाला कॉल का मिळू शकत नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. तरी कॉल मिळण्याची शक्यता वाढविण्याकरिता तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक माहितीत झालेला बदल, इतर आवश्यक माहिती वेळीच नोंदविणे आवश्यक आहे.
अनुभवाची नोंद सेवायोजन कार्यालयात वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
      अनुभव असल्यास त्याची नोंद सेवायोजन कार्यालयात करणे आवश्यक आहे. उद्योजकाने विहीत प्रकारचा व विशिष्ठ कालावधीचा अनुभव असलेल्या उमेदवारांची मागणी केलेली आहे व तो अनुभव आपल्याकडे नाही किंवा आपल्याकडे अनुभव असून देखील त्याची नोंद आपण केलेली नाही.
गुणांची टक्केवारी
      उद्योजकाने मागणीमध्ये निश्चित केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार आपणास गुणांची टक्केवारी नसल्यामुळे जेष्ठतेत असूनदेखील तुम्हाला कॉल मिळत नाही.
तुमचा वास्तव्याचा पत्ता
      काही वेळा उद्योजकाने स्थानिक उमेदवारास संधी देण्याचे निश्चित केलेले असल्याने त्याच गावातील उमेदवारांची मागणी केलेली असल्यास व त्या परिसरातील आपले वास्तव्य नसल्यास अशा वेळी आपण जेष्ठतेत असूनदेखील तुम्हाला कॉल मिळत नाही.
स्त्री / पुरूषांकरिता राखीव जागा
      काही पदे केवळ महिलांकरिता राखीव असल्याने आपण पुरूष असल्याने पात्रता व जेष्ठता असूनदेखील आपणास कॉल मिळत नाही.
उमेदवारांच्या पत्त्यामध्ये झालेला बदल
      नोंदणी करताना उमेदवारांनी चुकीचा अथवा अपूर्ण पत्ता दिलेला असल्याने अथवा पत्त्यात बदल झाल्यानंतर त्याची नोंद सेवायोजन कार्यालयात न केल्यामुळे आपणास कॉल पाठवूनसुध्दा मिळत नाही.
सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पध्दत
      जर तुम्हाला जेष्ठतेत असल्यामुळे कायम नोकरीकरिता सलग तीन वेळा सेवायोजन कार्यालयातून कॉल मिळाला असल्यास त्यानंतर पुढील कॉल मिळण्याकरिता नोंदणीपटावरील तुमच्या पात्रतेच्या तुमच्यानंतरच्या सर्व उमेदवारांना संधी दिल्यानंतर तुम्हाला पुनःश्च कॉल मिळण्यास विलंब होतो.
पद भरती रद्द झाल्याने
      तुम्ही जेष्ठतेत असल्याने उद्योजकांच्या मागणीनुसार तुमची पाठवणी केली आहे. परंतू उद्योजकाने काही कारणास्तव जर सदरची पदे रद्द केली तर तुम्हाला अपेक्षित असलेला कॉल मिळू शकत नाही.
पद भरतीची कार्यवाही प्रलंबित असल्याने किंवा पद भरती रद्द झाल्याने
       तुम्ही जेष्ठतेत असल्याने तुमच्या नावाची शिफारस उद्योजकाकडे करण्यात आलेली आहे. तथापि तुम्हाला कॉल येत नसल्यास याबाबत तुम्ही संबंधित उद्योजकाकडे चौकशी करावी.
अपंग असल्यास नोंद करणे आवश्यक
      अपंग उमेदवारांना काही ठराविक पदांकरिताच नोकरी मिळू शकते. तुम्ही अपंग असल्यास त्याची नोंद केली नसल्यास तुम्ही जेष्ठतेत असूनदेखील तुम्हाला कॉल मिळू शकत नाही.
वर्ग-४ च्या पदाकरिता
      उद्योजकाने वर्ग-४ च्या पदाकरिता मागणी केलेली असल्यास सेवायोजन कार्यालयामध्या १० वी च्या खालील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांचीच उद्योजकांकडे शिफारस केली जात असल्याने १० वी व त्यावरील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची शिफारस होत नाही.
तुमची व मित्राची शैक्षणिक पात्रता सारखीच आहे
      तुमची व मित्राची शैक्षणिक पात्रता सारखीच आहे व तुम्ही दोघांनी सेवायोजन कार्यालयात एकाच दिवशी नोंदणी केली आहे, तथापि तुमच्या दोघांच्या जातीचा प्रवर्ग वेगळा आहे. अशा वेळेस तुम्हाला कॉल मिळणार नाही परंतू तुमच्या मित्राला कॉल मिळणे शक्य आहे. उदा. तुम्ही विमुक्त जाती (अ) या प्रवर्गाचे आहांत व तुमचा मित्र अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आहे व उद्योजकाची मागणी अनुसूचित जमातीकरिता असल्यास तुम्हाला कॉल मिळणार नाही, परंतू तुमच्या मित्राला कॉल मिळू शकतो कारण त्या प्रवर्गात रिक्त पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेतील उमेदवार कमी असू शकतात.
       वरील विवेचनावरून तुम्हाला कॉल का मिळू शकत नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच. तरी कॉल मिळण्याची शक्यता वाढविण्याकरिता तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक माहितीत झालेला बदल, इतर आवश्यक माहिती वेळीच नोंदविणे आवश्यक आहे.
मुखपृष्ट | झटपट नोकरी | प्रश्नावली | चालु घडामोडी | उपयुक्त वेबसाईटस् | जाहिराती | मागे | वरती
Disclaimer | Acknowledgement | Designed & Developed By
All rights reserved with Directorate of Employment & Self-Employment , Government of Maharashtra
Site optimized for 1024 X 768 monitor resolution, Best viewed in IE / Opera.